वेळेवर निकाल जाहीर करा, डीबाटू केंद्राला विद्यार्थ्यांनी ठोकले टाळे

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (डीबाटू) विभागीय केंद्रातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून डी बाटू . मात्र, तीन दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बाटूच्या केंद्राला टाळे ठोकून आंदोलन आणखी तीव्र केले.

सरसकट कॅरी- ऑन लागू करा, लेट रिझल्ट बंद करा, प्रलंबित निकाल जाहीर करून मार्कशीटस तात्काळ द्या, निकाल ४५ दिवसांत जाहीर करा, एनइपी जुन्या विद्यार्थ्यांवर लादू नका, अकॅडमीक कॅलेंडर चे काटेकोर पालन करा. या मागणीसाठी गेले तीन दिवसांपासून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आंदोलन केले जात आहे. विशेष म्हणजे आंदोलनस्थळी प्रशासनाचा एकही अधिकारी अथवा कर्मचारी भेट देण्यासाठी न आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त विद्यार्थ्यांनी आज डीबाटूच्या कार्यालयाला प्रतीकात्मक टाळे ठोकत निषेध नोंदविला. त्यानंतर कार्यालयाच्या प्रांगणात बसून विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन जागे व्हावे, विद्यार्थ्यांना न्याय द्या, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रश्न प्रलंबित आहेत. त्याकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाकडून कोणतीही सकारात्मक कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. प्रशासनाने तातडीने चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनादरम्यान प्रदेश प्रवक्ते रविकांत वर्पे, माने, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, सुधाकर दानवे, जिल्हाध्यक्ष भूषण तांबे, शहराध्यक्ष सुशिल बोर्डे, प्रदेश सरचिटणीस अजिंक्य किर्जत, आनंद मगरे, तालुकाध्यक्ष हर्षल निकम, सिद्धांत गुटीकर, वैभव देवरे, प्रदीप शिंदे, आदित्य दाभाडे, आदित्य थोरात, निनाद गायकवाड, मायकल विशाल, संकेत काचोळे, शहर अध्यक्ष ख्वाजाभाई शरफोद्दीनं मुल्ला सह आदी विद्यार्थी सहभागी आहेत.